७५ हजार विद्यार्थी एकसुरात गाणार राज्यगीत, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उपक्रम

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी इयत्ता ८ वी ते १२ वीचे जिल्हाभरातील ७५,००० हून अधिक विद्यार्थी सामूहिक गीत गायन व सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत. यातील ३० हजार विद्यार्थी प्रत्यक्ष तर उर्वरित ४५ हजार विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देणे, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख पटवणे, आणि स्वराज्य, संस्कृती व स्वाभिमान ही परंपरा पुढे नेण्याची प्रेरणा देणे असा या उपक्रमाचा हेतू आहे. या अनुषंगाने बुधवार, १७ रोजी गोकुळ स्टेडीयम, पोलीस मुख्यालय, ग्रामीण हडको येथे सकाळी ९ वा. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, तसेच लोकप्रतिनिधींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या दिवशी विद्यार्थी सामूहिक श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीते तसेच विविध उपक्रम राबवतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली.

एक हजार बसेसची व्यवस्था

३० हजार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एकूण १ हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्कुल बसेस तसेच दानशूरांकडून बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बसेसच्या पार्किंगसाठीही नियोजन करण्यात आले आहे.

दानशूरांना आवाहन

दरम्यान, सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहार, बिस्कीट पॅकेट्स, पाणी बॉटल्स पुरवण्यासाठी एनजीओ तसेच सामाजिक संस्था व दानशूरांना आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष ३० हजार विद्यार्थी

'जागर दशसूत्रीचा - स्वरगौरव मुक्तीसंग्रामाचा' या घोषवाक्याखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात एकूण ७५ हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होती. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग होणार आहे. जिल्ह्यातून ३० हजार विद्यार्थी शहरातून प्रत्यक्ष सहभागी असतील तर प्रत्येक तालुक्यातून ५ हजार याप्रमाणे ४५ हजार विद्यार्थी दुरदृष्य प्रणालीने तालुकास्तरावरुन सहभागी होतील.
- दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी)